
पुणे मेट्रो लाईन ३

प्रकल्पाची ओळख आणि ठळक वैशिष्ट्ये
राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी आणि शाश्वत शहरीकरणास चालना देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे “पुणे मेट्रो लाईन – ३” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प हिंजवडीपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.
ही उंचावरील (Elevated) मेट्रो लाईन एकूण 23.203 किमी लांबीची असून या मार्गावर 23 स्थानके प्रस्तावित आहेत.
हा प्रकल्प केंद्र सरकारच्या नवीन मेट्रो रेल्वे धोरण 2017 अंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) पद्धतीवर राबविण्यात येणारा पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प Design, Build, Finance, Operate आणि Transfer (DBFOT) या मॉडेलवर आधारित आहे.
या प्रकल्पाचे काम TRIL Urban Transport Pvt. Ltd. आणि Siemens Project Ventures GmbH यांच्या संयुक्त विद्यमाने (Joint Venture) देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ‘Pune IT City Metro Rail Limited’ हे विशेष उद्देश वाहन (Special Purpose Vehicle – SPV) स्थापन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च (जमीन अधिग्रहण, सुविधा स्थलांतर इत्यादींसह) ₹8313 कोटी इतका आहे. या मेट्रोच्या माध्यमातून प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल, अपघातांना आळा बसेल, रस्ते वाहतुकीवरील गर्दी कमी होईल आणि शहराच्या रहिवासक्षमतेत एकूणच सुधारणा होईल.
प्रमुख फायदे
मेट्रो ही कार्यक्षम आणि जलद वाहतूक सुविधा असून, ती शहरातील नागरिक आणि कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरेल. ही वातानुकूलित, आरामदायक, सुरक्षित आणि जलद वाहतूक सुविधा प्रवासाचा कालावधी, इंधन खर्च व प्रवास खर्च कमी करण्यास मदत करेल तसेच ध्वनी व वायू प्रदूषणात घट घडवेल. परिणामी, या प्रदेशात अधिक गुंतवणूक आकर्षित होईल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण विकास व समृद्धीचा मार्ग मोकळा होईल.















