Shri Devendra Fadanvis Sir

श्री.आचार्य देवव्रत

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते. जुलै २०१९ मध्ये त्यांनी गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला.

शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी ४४ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असणारे श्री. आचार्य देवव्रत यांना योग विज्ञान आणि निसर्गोपचार क्षेत्रातील २२ वर्षांचा अनुभव आहे. अध्यापन आणि शैक्षणिक प्रशासनातील तब्बल ३४ वर्षांचा अनुभव असणारे आचार्य देवव्रत यांचे नाव देशाच्या राजकारणात आदराने घेतले जाते. १९८१ ते २०१५ इतका प्रदीर्घ काळ त्यांनी हरयाणा राज्यातील गुरुकुल कुरुक्षेत्राचे प्राचार्य म्हणून काम केले. या काळात या संस्थेची सातत्याने भरभराट झाली. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतानाच्या त्यांच्या कार्यकाळात शून्य खर्चात नैसर्गिक शेती, गायींचे संगोपन आणि प्रजाती सुधारणा, “बेटी बचाओ-बेटी पढाओ”, सामाजिक सद्भाव, व्यसनमुक्ती, “स्वच्छ हिमाचल अभियान”, वृक्षारोपण आणि जलसंवर्धन असे अनेक प्रकल्प आणि मोहिमा मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सहभागातून राबविण्यात आल्या.

गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना कोवीड साथरोगाच्या काळात त्यांच्या पुढाकाराने गुजरातमधील राजभवनाने कोरोना सेवा यज्ञाचे आयोजन केले, ज्याअंतर्गत एक लाख गरजू लोकांना आवश्यक साहित्य आणि आरोग्य उपकरणे पुरवण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुजरातमधील सर्व विद्यापीठांमध्ये त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

वैदिक मानवी मूल्ये आणि तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन जनतेमध्ये राष्ट्रवादी विचार आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारे, युवा वर्गाला सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे, योगिक आणि वैदिक जीवनशैली लोकप्रिय करण्यासाठी उपक्रम राबविणारे श्री. आचार्य देवव्रत हे एक वंदनीय व्यक्तिमत्व आहेत.