
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)
पुणे महानगर प्रदेश (PMR) हा महाराष्ट्राला जागतिक आर्थिक क्रियाकलापांच्या आघाडीवर नेण्यासाठी आम्ही सक्षमपणे विकसित करीत असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या वृद्धी-केंद्रांपैकी एक आहे. जगभर झपाट्याने शहरीकरण होत असताना, औद्योगिक प्रगतीच्या बळावर महाराष्ट्रातही शहरी परिवर्तन वेगाने घडत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे अध्यक्ष या नात्याने मला ठाम विश्वास आहे की आर्थिक महासत्ता आणि जागतिक नेतृत्व या दोन्ही रूपांत भारताचे भविष्य घडवण्यात आपल्या राज्याची निर्णायक भूमिका आहे. PMRDA ची स्थापना ही या व्यापक दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे.
शैक्षणिक उत्कृष्टता, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक स्थान यांचा अनोखा संगम असलेले पुणे, भारतातील अग्रगण्य विकासकेंद्रांपैकी एक होण्याची क्षमता बाळगते. PMRDA ची भूमिका केवळ या वाढीचे व्यवस्थापन करण्यापुरती मर्यादित नसून, उद्योगविस्तार, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मितीस पोषक असे वातावरण निर्माण करणेही आहे.
आम्ही पुढे जात असताना, योग्य धोरणात्मक उपाययोजना, पायाभूत गुंतवणुकी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि उद्योगस्नेही सुशासन यांच्या बळावर PMR भारत आणि जगासाठी समृद्धी, नवोपक्रम व प्रगतीचे दिशादर्शक ठरेल, याची मला खात्री आहे. आमची दृष्टी स्पष्ट आहे—रोजगार निर्माण करणारे, संपत्ती निर्मितीला चालना देणारे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा करणारे गतिमान, शाश्वत आणि जीवन्त शहरी प्रदेश घडवणे.






